कोथिंबिरचा लागवड खर्च निघणेही कठीण; साडेतीन एकरवर शेतकऱ्यांनी फिरविला रोटावेटर

By हरी मोकाशे | Published: March 27, 2023 06:24 PM2023-03-27T18:24:14+5:302023-03-27T18:34:23+5:30

बोरगाव काळे परिसरातील बहुतांश शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याची लागवड करतात.

Coriander cultivation costs are also difficult to cover; Farmers rotated rotavator on three and a half acres in Latur | कोथिंबिरचा लागवड खर्च निघणेही कठीण; साडेतीन एकरवर शेतकऱ्यांनी फिरविला रोटावेटर

कोथिंबिरचा लागवड खर्च निघणेही कठीण; साडेतीन एकरवर शेतकऱ्यांनी फिरविला रोटावेटर

googlenewsNext

बोरगाव काळे ( लातूर) : निसर्गातील बदलेल्या वातावरणामुळे कोथिंबिरीचे पीक पिवळे पडले. शिवाय बाजारपेठेत भाव नसल्याने लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. यामुळे लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथील दोघा शेतकऱ्यांनी सोमवारी शेतातील कोथिंबिरीवर रोटावेटर फिरवून पीक मोडले आहे.

दोन शेतकऱ्यांनी कोथिंबीरला भाव नाही व निसर्गाच्या बदलाने पीक पिवळे पडल्याने लागवड केलेला खर्च निघणे कठीण झाल्याने आपल्या शेतातील पेरलेल्या कोथिंबीर पिकावर रोटावेटर ट्रक्टर फिरवून पीक मोडीत काढले आहे. त्यामुळे या दोन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. बोरगाव काळे परिसरातील बहुतांश शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याची लागवड करतात. पत्ताकोबी, फुलकोबी, शिमला मिरची, वांगे, मेथी, कोथिंबीर, दोडका आदी भाजीपाल्यांची लागवड करीत असतात. उन्हाळ्याच्या कालावधीत कोथिंबिरीस चांगली मागणी असते. त्यामुळे दरही चांगला मिळेल, या आशेने येथील शेतकरी आप्पासाहेब काळे व निरंजन डोंगरे यांनी साडेतीन एकरवर कोथिंबिरीची लागवड केली होती. मध्यंतरी वातावरणात बदल झाल्याने काढणीस आलेली कोथिंबिर पिवळी पडली. दरम्यान, या शेतकऱ्यांनी कोथिंबिरीची काढणी करुन बाजारपेठेत विक्रीसाठी नेले असता कॅरेटला १०० ते १५० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्याने अखेर या कोथिंबिरीवर रोटावेटर फिरविला आहे.

सोयाबीनलाही भाव नाही...
सध्या बाजारपेठेत सोयाबीनला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतिक्षा लागून आहे. दरम्यान, कोथिंबिरीचे दरही घसरले आहेत, असे या शेतकऱ्यांनी सांगितले. नोव्हेंबरमध्येही कोथिंबीर लागवड केली होती. मात्र, तेव्हाही फटका बसला. उन्हाळ्यात चांगला भाव मिळेल, अशी आशा होती. परंतु, ती फोल ठरली आहे. त्यामुळे आप्पासाहेब काळे यांनी दीड एकरवरील तर निरंजन डोंगरे यांनी दोन एकरवरील कोथिंबीर पिकावर रोटावेटर फिरविला.

वाहतूकही परवडेना...
बाजारात कोथिंबिरीचे भाव कमी-जास्त होत आहेत. सध्या निश्चित दर मिळत नाही. दीड लाखाचे उत्पादन अपेक्षित होते. परंतु, वाहतूक खर्चही निघणे कठीण वाटत असल्याने ट्रॅक्टरद्वारे रोटावेटर फिरविला.
- आप्पासाहेब काळे, शेतकरी.

भाव नसल्याने पीक मोडले...
नोव्हेंबरमध्ये दोन एकरवर कोथिंबीर केली होती. तेव्हाही भाव नव्हता. मार्च- एप्रिलमध्ये चांगला भाव राहील, असे खरेदीदार सांगत होते. त्यामुळे लागवड केली होती. परंतु, दरात वाढ होत नसल्याने अखेर कोथिंबीर पीक मोडले.
- निरंजन डोंगरे, शेतकरी.

Web Title: Coriander cultivation costs are also difficult to cover; Farmers rotated rotavator on three and a half acres in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.