कोल्हापूर संस्थानचा शाही दसरा सोहळा उत्साहात; शाहू छत्रपती यांच्या हस्ते शमी पूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 11:24 PM2021-10-15T23:24:16+5:302021-10-15T23:24:41+5:30

देशातील ५१ व महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपीठातील एक देवता असलेल्या अंबाबाईच्या नवरात्रोत्सवात विजयादशमीला देवीची रथातील पूजा बांधली जाते.

Royal Dussehra celebrations of Kolhapur Sansthan in full swing; Shami Pujan at the hands of Shahu Chhatrapati | कोल्हापूर संस्थानचा शाही दसरा सोहळा उत्साहात; शाहू छत्रपती यांच्या हस्ते शमी पूजन

कोल्हापूर संस्थानचा शाही दसरा सोहळा उत्साहात; शाहू छत्रपती यांच्या हस्ते शमी पूजन

googlenewsNext

कोल्हापूर:  धर्मसत्ता व राजसत्तेचा सुंदर मिलाप करणारा शाही दसरा सोहळा शुक्रवारी मावळतीच्या सुर्यकिरणांच्या साक्षीने ऐतिहासिक दसरा चौकात संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ निमंत्रितांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात शाहू छत्रपती यांच्या हस्ते शमी पूजन झाले. लव्याजम्यानिशी आलेली अंबाबाईची, तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी, सरदार घराणी, देवीची आरती, बंदुकाच्या फैरी झाडून सलामी, आतषबाजीने हा सोहळा रंगला. 

देशातील ५१ व महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपीठातील एक देवता असलेल्या अंबाबाईच्या नवरात्रोत्सवात विजयादशमीला देवीची रथातील पूजा बांधली जाते. आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी अंबाबाई रथातून निघाली आहे असा याचा अर्थ आहे. कोल्हापुरचा शाही दसरा सोहळा प्रसिद्ध आहे. सायंकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी शमी पूजनाचा मुहूर्त होता. तत्पूर्वी पाच वाजता अंबाबाईची पालखी लव्याजम्यानिशी दसरा चौकासाठी रवाना झाली. तुळजाभवानीदेवीची पालखीही येथे पोहोचली. देवीची आरती झाल्यानंतर शाहू छत्रपतींनी शमी पूजन केले. बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. 

यावेळी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजराजे, यशस्विनीराजे , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, जयंत आसगावकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  यानंतर मेबॅक कारमध्ये उभे राहून शाहू छत्रपतींनी नागरिकांना सोने दिले. सोहळा संपल्यानंतर तुळजाभवानी देवीची पालखी जूना राजवाड्यात गेली. अंबाबाईची पालखी सिद्धार्थनगरमार्गे पंचगंगा नदी घाटावर गेली. 

Web Title: Royal Dussehra celebrations of Kolhapur Sansthan in full swing; Shami Pujan at the hands of Shahu Chhatrapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.