भाजपने चकीत केले! विधानसभेतील बंडखोर उमेदवारांना दिली निवडणुकीची जबाबदारी

By Ajay.patil | Published: June 8, 2023 05:12 PM2023-06-08T17:12:09+5:302023-06-08T17:12:24+5:30

अत्तरदे, शिंदेवर जळगाव ग्रामीण, पाचोऱ्याच जबाबदारी : डॉ.राधेश्याम चौधरी, नंदकुमार महाजनांवर लोकसभेची जबाबदारी

BJP list! The rebel candidates in the assembly were given the responsibility of the election in jalgaon | भाजपने चकीत केले! विधानसभेतील बंडखोर उमेदवारांना दिली निवडणुकीची जबाबदारी

भाजपने चकीत केले! विधानसभेतील बंडखोर उमेदवारांना दिली निवडणुकीची जबाबदारी

googlenewsNext

जळगाव - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली तयारी सुरु केली असून, गुरुवारी भाजपकडून लोकसभा व विधानसभानिहाय निवडणूक प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०१९ च्या निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी करणाऱ्या चंद्रशेखर अत्तरदे व पाचोऱ्यातून उमेदवारी करणाऱ्या अमोल शिंदे यांच्यावर त्या-त्या मतदारसंघाच्या निवडणुकीची जबाबदारी दिली आहे.

त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच ज्या मतदारसंघात सध्यस्थितीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. त्या ठिकाणी भाजपने विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख नेमले आहेत. त्यामुळे भाजप स्वबळावरच निवडणूक लढवेल का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. जर मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण, एरंडोल, पाचोरा, चोपडा या जागा भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडे आहेत. तर मग या मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुख नियुक्ती करण्याची गरज काय ? असा ही प्रश्न आता अनेकांकडून उपस्थित होण्याची शक्यता आहे. भाजपकडून  मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा मतदारसंघ व विधानसभा मतदारसंघ निहाय निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

डॉ.चौधरींवर जळगाव तर महाजनांवर रावेर लोकसभेची जबाबदारी
लोकसभेच्या निवडणुका अवघ्या ८ महिन्यांवर आल्या आहेत. त्यासाठी भाजपने लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली आहे. त्यात भाजप प्रदेश कार्यकारणीचे सदस्य डॉ.राधेश्याम चौधरी  यांची जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी तर जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांची व रावेर लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.राधेश्याम चौधरी यांना भाजपने गेल्या महिनाभरातच दुसरी महत्वाची जबाबदारी दिली आहे. तर नंदकुमार महाजन यांचाही भाजपने संघटनेत सहभाग करून घेतला आहे.

जिल्हाध्यक्ष निवडीकडे लागले लक्ष
भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या असल्या, तरी जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष पदाची अद्याप घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता पक्षाकडून जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

-लोकसभेची जबाबदारी
जळगाव लोकसभा - डॉ.राधेश्याम चौधरी
रावेर लोकसभा - नंदकुमार महाजन

-विधानसभा निवडणूक प्रमुख
चोपडा - गोविंद शेंगदाणे
रावेर - अमोल जावळे
भुसावळ - संजय पाटील
जळगाव शहर - विशाल त्रिपाठी
जळगाव ग्रामीण - चंद्रशेखर अत्तरदे
अमळनेर - स्मिता वाघ
एरंडोल - करण पवार
चाळीसगाव - भुवनेश्वर पाटील
पाचोरा - अमोल शिंदे
जामनेर - चंद्रकांत बाविस्कर
मुक्ताईनगर - अशोक कांडेलकर

Web Title: BJP list! The rebel candidates in the assembly were given the responsibility of the election in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा