जयप्रकाश मुंदडा गद्दार; उद्धव ठाकरेंना भेटून त्यांना धडा शिकवू : खा. हेमंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 04:58 PM2021-10-16T16:58:37+5:302021-10-16T17:01:08+5:30

खा.हेमंत पाटील यांच्यावर वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा मिरवणुकीत सहभागी झाल्याने गुन्हा दाखल झाला आहे. तो मागे घेण्याच्या मागणीसाठी ही बैठक होती.

Jaiprakash Mundada is traitor for Shiv Sena; Let's meet Uddhav Thackeray and teach him a lesson | जयप्रकाश मुंदडा गद्दार; उद्धव ठाकरेंना भेटून त्यांना धडा शिकवू : खा. हेमंत पाटील

जयप्रकाश मुंदडा गद्दार; उद्धव ठाकरेंना भेटून त्यांना धडा शिकवू : खा. हेमंत पाटील

googlenewsNext

हिंगोली : शिवसेनेचा २० वर्षे आमदार राहूनही मागच्या लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा ( Jayprakash Mundada ) यांनी पक्षाशी गद्दारी केली. आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावरूनही विरोधकांना हाताशी धरून तेच कित्ता गिरवत आहेत. एवढे दिवस शांत होतो, मात्र आता सहन होत नाही. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thakarey ) यांना भेटून मुंदडा यांना धडा शिकवू, असा इशारा खा. हेमंत पाटील ( MP Hemant Patil ) यांनी आज विश्रामगृहावर आयोजित बैठकीत दिला.

खा.हेमंत पाटील यांच्यावर वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा मिरवणुकीत सहभागी झाल्याने गुन्हा दाखल झाला आहे. तो मागे घेण्याच्या मागणीसाठी ही बैठक होती. शिवाय आमदार राजू नवघरे यांनीही खासदारांनी म्हटल्याने पुतळ्याच्या घोड्यावर चढल्याचे वक्तव्य करून दिशाभूल चालविल्याचा आरोपही खा.पाटील यांनी केला. त्यांचा बोलविता धनी आपल्याच पक्षाचा आहे. मात्र मी नवघरे यांना असे म्हटल्याची एक क्लिप दाखविली तर खासदारकीचा राजीनामा देवून राजकारण सोडून देईन, असा ठाम विश्वास व्यक्त केला. तर शिवसेनेच्या लोकांना विश्वासात न घेता आम्हीच सर्व काही पाहू, असे सांगून मुंदडा आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही विरोध करीत आहेत. वसमत, जवळा बाजार या सेनेच्या ताब्यातील बाजार समित्या बरखास्त करण्याची मागणी ते कशी करू शकतात? कोणताही अधिकार नसताना पदाधिकारी निवडीचे पत्र लोकांना वाटत फिरत आहेत. ही बाब गंभीर असल्याचेही म्हणाले. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी या भागातील शिवसैनिकांचे शिष्टमंडळ नेवू, असेही ते म्हणाले.

यावेळी आ.संतोष बांगर यांनीही मुंदडा यांच्यावर घणाघात चढवत जर पक्षापेक्षा कुणीही मोठा नसल्याचे सांगितले. तर कोणाच्या सांगण्यावरून पुतळ्यावर चढायला राजू नवघरे हे लहान बाळ नाहीत. ते आमदार आहेत. त्यांनी अनावधानाने का होईना केलेला प्रकार चुकीचा आहे. तो मान्य करून जनतेची माफी मागितल्याने विषय संपला होता. मात्र त्याला राजकीय वळण देत असाल तर शिवसेनेने घडल्या प्रकाराचा निषेधच करायला पाहिजे होता. छत्रपती शिवाजी महाराजच शिवसेनेसाठी आण, बाण व शान आहेत. मात्र तरीही या प्रकरणात सेनेने शांततेची भूमिका घेतली होती, असेही ते म्हणाले.

सभेच्या सुरुवातीलाच वसमतमध्ये सुरू असलेल्या राजकीय प्रकाराबाबत तालुकाप्रमुख राजू चापके, जि.प.तील गटनेते अंकुश आहेर यांनी माजी मंत्री डॉ.जयप्रकाश मुंदडा हे कसे जबाबदार ? पटवून दिले. तर प्रल्हाद राखोंडे यांनी आ.राजू नवघरे यांनी चूक मान्य केल्यानंतर विषय संपला होता. मात्र तरीही पुन्हा तेच त्याचे भांडवल करून इतरांनाही ओढण्याचा प्रयत्न करीत असतील तर चुकीचे असल्याचे म्हटले. यावेळी मंचावर जि.प.अध्यक्ष गणाजी बेले, उद्धवराव गायकवाड, राम कदम, डॉ.सतीश शिंदे यांच्यासह जिल्हाभरातून आलेल्या शिवसैनिकांची उपस्थिती होती. यात बाळासाहेब मगर, भानुदास जाधव, राजेश इंगोले, देवीदास कऱ्हाळे, संदेश देशमुख, नंदकिशोर खिल्लारे, विठ्ठल चौतमल आदींचा समावेश होता.

Web Title: Jaiprakash Mundada is traitor for Shiv Sena; Let's meet Uddhav Thackeray and teach him a lesson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.