धावत्या एसटीला आग! चालकाची सतर्कता, ३५ प्रवाशांचा जीव वाचला!!

By रमेश वाबळे | Published: May 19, 2023 10:13 PM2023-05-19T22:13:48+5:302023-05-19T22:14:33+5:30

हिंगोली शहरातील घटना, वेळीच आग अटोक्यात आणली

Fire to running ST bus Vigilance of the driver saved the lives of 35 passengers in Hingoli | धावत्या एसटीला आग! चालकाची सतर्कता, ३५ प्रवाशांचा जीव वाचला!!

धावत्या एसटीला आग! चालकाची सतर्कता, ३५ प्रवाशांचा जीव वाचला!!

googlenewsNext

रमेश वाबळे, हिंगोली: नांदेड जिल्ह्यातील भोकरहून अकोलाकडे निघालेल्या एसटी बसला आग लागल्याची घटना हिंगोली शहरातील पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात १९ मे रोजी रात्री ७:३० च्या सुमारास घडली. दरम्यान, चालकाच्या सतर्कतेने ही घटना वेळीच लक्षात आल्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला उभी करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे घाबरगुंडी उडालेल्या प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

भोकर आगाराची एम.एच.२० बीएल ३५६६ ही बस ३० ते ३५ प्रवाशांना घेऊन भोकरहून दुपारी ३ च्या सुमारास अकोलाकडे निघाली. बस नांदेड, वारंगा फाटा, कळमनुरी, हिंगोली, वाशिममार्गे अकोला येथे जाणार होती. परंतु, ही बस नांदेड- हिंगोलीमार्गे शहरातील नाईकनगर भागात दाखल होताच पाठीमागील चाकाजवळून धूर निघत असल्याचे चालक भांडे यांच्या लक्षात आले. त्यांनी सतर्कता बाळगून बस रस्त्याच्या कडेला उभी करून प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. तोपर्यंत मात्र टायरने पेट घेतला होता. त्यामुळे प्रवाशांची एकच घाबरगुंडी उडाली होती. काही प्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर जवळच असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचे लक्ष गेले. त्यांनी तत्काळ धाव घेऊन पेट्रोल पंपावरील अग्निशमन यंत्राच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. तर, या मार्गावरील वाहनेही काही वेळ थांबली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी सुरेश वायकुळे, अरुण गडदे, संदीप घुगे यांच्यासह पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

घटनेची माहिती हिंगोली एसटी आगाराला कळविण्यात आल्यानंतर आगारप्रमुख सूर्यकांत थोरबोले, वाहतूक निरीक्षक एफ.एम.शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे अडकून पडलेल्या वाशिम, अकोलाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हिंगोली आगाराच्या वतीने एसटी बस उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर पुढील प्रवासासाठी प्रवासी रवाना झाले.

Web Title: Fire to running ST bus Vigilance of the driver saved the lives of 35 passengers in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.