दहावीतील मुलीने हॉस्टेलच्या खोलीतच घेतला गळफास; बोथी आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 11:42 PM2022-07-21T23:42:15+5:302022-07-21T23:42:28+5:30

HIngoli : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील बोथी शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिवानी सदाशिव वावधने (वय १६) ही दहाव्या वर्गात होती

Class 10 girl hanged herself in her hostel room; Type in Bothi Tribal Government Ashram School | दहावीतील मुलीने हॉस्टेलच्या खोलीतच घेतला गळफास; बोथी आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील प्रकार

दहावीतील मुलीने हॉस्टेलच्या खोलीतच घेतला गळफास; बोथी आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील प्रकार

Next

आखाडा बाळापूर (जिल्हा हिंगोली) : दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने कळमनुरी तालुक्यातील बोथी येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहातील आपल्या खोलीतच ओढणीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना २१ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील बोथी शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिवानी सदाशिव वावधने (वय १६) ही दहाव्या वर्गात होती. १५ जून रोजी शाळा सुरू झाल्यानंतर ती वसतिगृहात वास्तव्याला गेली. इयत्ता पाचवीपासून ती तेथे शिकत होती. शिवानी मूळ गाव वारंगा येथील होती. हॉस्टेलच्या वार्डन सविता विणकरे या २१ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास वसतिगृहात नियमित तपासणी करत असताना एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी हा प्रकार मुख्याध्यापक किशन खांडरे यांच्या कानी घातला. त्यांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. त्यानंतर फौजदार शिवाजी बोंडले, राठोड, शिवाजी पवार हे घटनास्थळी पोहोचले. 

सदर मुलीच्या पालकांना याबाबत खबर देण्यात आली. मुलीचे प्रेत बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले आहे. रात्रीच्या वेळी शवविच्छेदनाची सोय येथे नसल्याने उद्या  शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप दुर्गे यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयात नातेवाइकांनी मोठी गर्दी केली आहे. माजी आमदार डॉ. संतोष टारफे, डॉ. सतीश पाचपुते  रुग्णालयात दाखल झाले असून तेही घटनेची माहिती घेत आहेत. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कळमनुरीचे पोलीस निरीक्षक निकाळजे यांना बाळापूर येथे पाठवले आहे. नातेवाईकांकडून शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप केला आहे. 

मध्यंतरानंतर वर्गात गेली नाही- विणकरे 
अकरा ते पाच ही शाळेची वेळ असून ती सकाळी शाळेत होती. तीन वाजता शाळेच्या मध्यंतराच्या सुटीत सर्व मुली हॉस्टेलमध्ये फ्रेश होण्यासाठी जातात. सर्वांसोबत शिवानीही हॉस्टेलमध्ये गेली. परंतु शाळा भरल्यानंतरही ती वर्गात गेलीच नाही. सायंकाळी पाचच्या सुमारास नियमित चेकिंग करताना तिने गळफास घेतल्याचे दिसले. मी घाबरून ही घटना मुख्याध्यापकांना सांगितली, अशी माहिती विणकर यांनी दिली.

डाव्या हातावर कापल्याच्या खुणा...
सदर मुलीचा मृतदेह पोलिसांनी तपासला असता, तिच्या डाव्या हातावर ब्लेडने कापल्याच्या खुणा दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. कापलेल्या खुणा कशाच्या आहेत? याचाही शोध पोलीस घेत आहेत.

मुख्याध्यापक, वस्तीगृहाच्यावार्डनविरुद्धगुन्हादाखल...

मयत मुलीचे वडील सदाशिव नागोराव वावधने ( रा. वारंगा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शासकीय निवासी आश्रमशाळा, बोथीचे मुख्याध्यापक किशन ईरबा खांडरे व महिला वस्तीगृहाच्या वार्डन सविता विनकरे यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 306 , 34 व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3 (2) ,(5) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझी मुलगी शासकीय निवासी आश्रम शाळेत शिकायला असताना शाळा प्रशासनाच्या ताब्यात होती. त्यांनी तिला त्रास दिला. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच तिने आश्रम शाळेतील खोलीमध्ये गळफास घेतला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे करीत आहेत.

Web Title: Class 10 girl hanged herself in her hostel room; Type in Bothi Tribal Government Ashram School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.