ध्येय ठरवलं की मागे वळून पाहायचं नाही - विश्वास नांगरे पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 12:15 PM2023-06-07T12:15:49+5:302023-06-07T12:16:24+5:30

अर्जुनी मोरगाव येथे प्रेरणात्मक व्याख्यान

Once the goal is decided, there is no looking back - Vishwas Nangre Patil | ध्येय ठरवलं की मागे वळून पाहायचं नाही - विश्वास नांगरे पाटील 

ध्येय ठरवलं की मागे वळून पाहायचं नाही - विश्वास नांगरे पाटील 

googlenewsNext

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : माझ्यात सूर्यासारखं तेज नाही. पण मी काजव्यासारखं चमकेन. मी उडू शकत नाही पण धावेन. धावू शकलो नाही तरी चालू शकेन. नाही चालू शकलो तरी सरपटन जाईन पण ध्येय साध्य करणार. हे क्रांतीचं वय आहे. शिवाजींनी १६-१७ व्या वयात स्वराज्याचं नंदनवन स्थापन केलं. हीच उमेद जागविण्याची, इतिहास घडविण्याची सुरुवात आहे. कोणत्या कुळात जन्म घ्यावं हे आपल्या हाती नसले तरी पुरुषार्थ दाखवणं आपल्या हातात आहे. एकदा ठरवलं की मागे वळून पाहायचं नाही, असे प्रतिपादन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. प्रेरणात्मक व्याख्यान ऐकण्यासाठी लांबवरून युवावर्ग व पालकवर्गाची उपस्थिती होती.

सोमवारी स्थानिक सरस्वती विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, माजी मंत्री राजकुमार बडोले, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक बनकर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. हिरेखन, हेमंत सुटे, डॉ. बल्लभदास भुतडा, भाजपचे तालुकाध्यक्ष विजय कापगते, शुभांगी मेंढे, शारदा बडोले उपस्थित होते. प्रारंभी बालासोर येथील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

नांगरे पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील मुलं रानपाखरांसारखी असतात. शहरी मुलांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणाऱ्यांमध्ये आत्मविश्वास असलाच पाहिजे. कष्ट केलेच पाहिजे. रोजच्या रोज जग बदलतं. अनेक गोष्टी कालबाह्य होतात. बदलत्या परिस्थितीचे ज्ञान अवगत केले पाहिजे. आराम नसायला पाहिजे. आराम करायला लागलो तर गंज चढतो. घाम गाळायचं खरे वय १८ ते २८ आहे. वाट लागायचंही वय हेच आहे. योग्य ते स्वीकारा. आयुष्यात कधी मोठं अन् कधी लहान, कधी कडक अन कधी मृदू व्हायचं ते कळलं पाहिजे. हळूहळू पण निश्चितपणे जे वाटचाल करतात ते यशस्वी होतात. स्वतःबद्दल व शत्रूबद्दल माहिती असली पाहिजे. बलस्थाने व दुर्बलस्थाने तसेच संधी आणि धोके याचं विश्लेषण करा. यशाचा मार्ग गवसतो. स्वतःची ओळख बनवायला शिका. आयुष्यात तपश्चर्या व चढउतार असलेच पाहिजेत. डोळ्यात स्वप्नं असली पाहिजेत. तत्त्वांशी प्रामाणिक राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. मोबाइल व व्यसनांपासून दूर राहा. मुलींना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, हल्लीची परिस्थिती योग्य नाही. स्वतःला सांभाळलं पाहिजे. मुलींनो, स्वतःच्या पायावर उभे राहा. स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवा. संकटाला घाबरायचं नाही, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

गुणवंतांचा सत्कार

अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या सुरबन बोडगाव येथील मूळचा रहिवासी असलेला अमित उंदिरवाडे याने यूपीएससी परीक्षेत ५८१ वी रँक मिळवली. त्याचे भरभरून कौतुक करत सत्कार केला. सोबतच हेमंत सुटे, योगिता मोझे, काजल रुखमोडे, धीरज भिवगडे सौंदड, पर्व रामटेके खजरी, मीनाक्षी कोसरकर खजरी, ईशिता उंदिरवाडे देवरी, हिमांशी करंजेकर, प्रेरणा हासिजा, हितेश्वरी शहारे, यशपाल गोंडाणे, आचल गुप्ता सालेकसा यांचा सत्कार केला.

कार्यक्रम राजकीय की अराजकीय?

कार्यक्रमाचे बॅनर, प्रचार प्रसारात कुठेही राजकीय पक्षाचे चिन्ह नव्हते. आयोजक हे राजकुमार बडोले व युथ फाउंडेशन हे होते. मात्र मंचावर भाषण करताना माजी मंत्र्यांना राहावलं नाही. त्यांनी आपण केलेल्या कार्याचा भाषणातून पाढा वाचलाच. आयोजकांपैकी राजकुमार बडोले हे मंचावर असले तरी युथ फाउंडेशनच्या एकही कार्यकर्त्याला मंचावर स्थान नव्हते हे विशेष. यामुळे हा राजकीय कार्यक्रम तर नाही ना? अशा चर्चा कार्यक्रमस्थळी होत्या.

Web Title: Once the goal is decided, there is no looking back - Vishwas Nangre Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.