गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; नवेगाव बांध येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 03:03 PM2022-07-22T15:03:54+5:302022-07-22T15:11:46+5:30

अजूनही पाणी कमी न झाल्यामुळे शेतातील पीकं सडण्याच्या मार्गावर

Farmers of Musdhalar, Navegaon Dam in Gondia district were hit by heavy rains | गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; नवेगाव बांध येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; नवेगाव बांध येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

googlenewsNext

गोंदिया : गुरुवारी पहाटे व शुक्रवारी सकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे नवेगावबांध येतील नाल्याच्या काठावरील व खोलगट भागातील धान शेतीला वाहून येणाऱ्या पाण्याच्या अतिरेकामुळे फटका बसला. यामुळे नुकतीच उरवणे झालेले धान पीक पाण्याखाली जाऊन ते सडलेले आहेत. तर अजूनही पाणी कमी न झाल्यामुळे संपूर्ण पीक सडण्याच्या मार्गावर असून सदर पिकाचे सर्वेक्षण करण्याची मागणी नवेगावबांध येथीलल शेतकऱ्यांनी तहसीलदार तलाठी यांच्याकडे केली आहे.

मागील आठवड्यात जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी नाल्याने पूर आला होता. तर बुधवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. जवळपास अर्धातास झालेल्या दमदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले हाेते. त्यामुळे यातून मार्ग काढताना नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाल्याने तो पाडण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे अंडरग्राऊंड मार्गे रेलटोलीकडे वाहतूक सुरू आहे; पण थोडाही पाऊस झाल्यावर अंडरग्राऊंड मार्गावर गुडघाभर पाणी साचते. गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प झाली होती. त्यामुळे शहरवासीयांना पुन्हा त्रास सहन करावा लागला. पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुजारीटोला धरणाचे चार दरवाजे उघडले

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने बुधवारी रात्री सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ४ दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले होते. गुरुवारीसुद्धा या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच होता. पावसाचा जोर वाढल्यास आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली असून, नदीकाठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गेल्या २४ तासांत अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात ७०.५ मिमी पाऊस झाल्याने या तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे, तर सडक अर्जुनी तालुक्यात २९.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. इतर तालुक्यात मात्र तुरळक स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली होती.

Web Title: Farmers of Musdhalar, Navegaon Dam in Gondia district were hit by heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.