नक्षल्यांची भीती कमी; कमलापूरच्या हत्तींना मिळेल का पर्यटकांचे प्रेम?

By मनोज ताजने | Published: November 21, 2022 12:21 PM2022-11-21T12:21:33+5:302022-11-21T12:26:14+5:30

राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प पर्यटन विकासापासून दूर

The only elephant camp in the state, away from tourism development, will the elephants of Kamalapur get the love of tourists? | नक्षल्यांची भीती कमी; कमलापूरच्या हत्तींना मिळेल का पर्यटकांचे प्रेम?

नक्षल्यांची भीती कमी; कमलापूरच्या हत्तींना मिळेल का पर्यटकांचे प्रेम?

Next

गडचिरोली : पूर्वी सर्कसमध्ये दिसणारे हत्ती आता केवळ चित्रात आणि टीव्हीवर पाहून मुलांना समाधान मानावे लागते. पण, मोकळ्या जंगलात फिरणारे, पर्यटकांना जवळून न्याहाळता येणारे आणि निरूपद्रवी असणारे हत्ती प्रत्यक्षात पाहायचे असतील तर गडचिरोली जिल्ह्यात यावे लागते.

'जंगलाचा जिल्हा' अशी ओळख असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात कमलापूर येथे राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प आहे. परंतु वन्यजीव विभाग आणि सरकारी यंत्रणेच्या उदासीनतेमुळे आतापर्यंत हा कॅम्प आणि येथील हत्तीही उपेक्षितच राहिले. नक्षल दहशतीच्या नावाखाली आजपर्यंत येथील हत्तींना पर्यटकांच्या प्रेमापासून मुकावे लागले. पण, आता परिस्थिती बदलत असताना हे हत्ती पर्यटनाच्या नकाशावर येतील का, असा प्रश्न पडला आहे.

१९६४ साली सुरू झालेल्या या 'हत्ती कॅम्प'मध्ये सद्य:स्थितीत ८ हत्ती आहेत. त्यातील दोन नर तर उर्वरित मादी आहे. यातील काही हत्तींना गुजरातच्या जामनगरमध्ये नेण्याची योजना होती. परंतु जनभावना लक्षात घेऊन अद्याप त्या हत्तींना हलविण्यात आलेले नाही. ५८ वर्षांपासून कार्यरत असलेला हा हत्ती कॅम्प पाहण्यासाठी महाराष्ट्रासह तेलंगणा आणि छत्तीसगडमधील पर्यटक येत असतात. मात्र, इतक्या वर्षांत या हत्ती कॅम्पकडे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत.

तरीही ज्यांना माहीत आहे ते पर्यटक मजल-दरमजल करीत कमलापूर गाठतात. पण, तेथील नैसर्गिक सौंदर्य, हत्तींना पाहूनही प्रसन्न होणाऱ्या पर्यटकांसाठी कोणत्याही सोयी नाहीत. त्यामुळे पर्यटनासोबत निर्माण होणाऱ्या जोडधंद्यांना या ठिकाणी चालना मिळू शकलेली नाही.

नक्षलवाद्यांचे नाही, आता हत्तींचे कमलापूर! 

कधीकाळी नक्षल चळवळीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमलापूरमधून आता नक्षलवाद्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. गावात वर्षातून एखादी पत्रकबाजी होते. पण, नक्षलवाद्यांनीही येथील हत्तींना किंवा कोणत्या पर्यटकांना कधी त्रास दिलेला नाही.

साडेतीन वर्षांपूर्वी या ठिकाणी पर्यटकांच्या विसाव्यासाठी कुटी, स्वच्छतागृह, सामूहिक डबापार्टीसारख्या कार्यक्रमासाठी शेड, तारांचे कम्पाउंड आणि कॅम्पच्या प्रवेशद्वारावर हत्तींचे पुतळे उभारण्यात आले होते. पण, एका रात्री नक्षलवाद्यांनी येऊन तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी कोणत्याही सोयी-सुविधा करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला नाही. वास्तविक, ३ वर्षांपूर्वीच्या आणि आजच्या स्थितीत बराच फरक पडलेला असल्याने आता पर्यटनाच्या दृष्टीने शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Web Title: The only elephant camp in the state, away from tourism development, will the elephants of Kamalapur get the love of tourists?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.