दीपक आत्रामांना पोलिसांनी रोखले, मंचावर एंट्री मिळाल्यावर भाषण ठोकले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 12:56 PM2023-06-02T12:56:57+5:302023-06-02T13:00:00+5:30

एकाच पक्षाच्या कार्यकर्त्यांना नोकऱ्या दिल्या: दीपक आत्राम; धर्मरावबाबा म्हणाले, माझा एक माणूस दाखवा आमदारकी सोडतो

Deepak Atram was stopped by the police, and his speech was interrupted when he entered the stage | दीपक आत्रामांना पोलिसांनी रोखले, मंचावर एंट्री मिळाल्यावर भाषण ठोकले

दीपक आत्रामांना पोलिसांनी रोखले, मंचावर एंट्री मिळाल्यावर भाषण ठोकले

googlenewsNext

गडचिरोली / आलापल्ली : अहेरी तालुक्यातील आलापल्लीत लॉयड मेटल्स कंपनीच्या हेल्मेट वाटपाच्या जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम व अलीकडेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार दीपक आत्राम यांच्यात १ जून रोजी जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. कंपनी एकाच पक्षाच्या कार्यकर्त्यांना नोकऱ्या कशा काय देते? असा रोकडा सवाल दीपक आत्राम यांनी विचारला, त्यावर माझा एक माणूस दाखवा, आमदारकी सोडतो, असे खणखणीत उत्तर धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहपहाडीवरील खनिज वाहतुकीने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धूळ, प्रदूषणासह वाहनांचा गोंगाट, पिकांची धूळधाण तसेच खराब रस्ते व बेदरकार वाहनांमुळे किड्या- मुंगीप्रमाणे सामान्यांचे चाललेले जीव यामुळे प्रचंड रोष आहे. अपघातग्रस्तांना मदत नाही, नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित आहेत, रस्ते दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलली जात नसताना लॉयड मेटल्स कंपनीने १ जूनला आलापल्लीत हेल्मेट वाटप कार्यक्रम आयोजित केला. यासाठी क्रिकेटपटू जितेश शर्मा, अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरला निमंत्रित केले. आमदार धर्मरावबाबा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम सुरू असतानाच माजी आमदार दीपक आत्राम यांनी एंट्री केली. समर्थकांसह ते मंचाकडे जाण्यास निघाले.

यावेळी उपअधीक्षक डॉ. सुदर्शन राठोड यांनी त्यांना रोखले. निमंत्रित नसताना मंचावर कसे काय जात आहात? असा सवाल डॉ. राठोड यांनी केला. त्यावर दीपक आत्राम यांनी मंचावर बसलेल्यांपैकी किती लोकांना निमंत्रण आहे? असा सवाल केला. यावेळी कंपनीचे अधिकारी एस. खांडवावाला, अतुल खाडीलकर यांनी दीपक आत्राम यांना मंचावर येऊ द्या, असा निरोप धाडला. दीपक आत्राम यांना मंचावर पहिल्या रांगेत खुर्ची मिळाली, त्यांनी आमदार धर्मरावबाबा यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर त्यांना आयोजकांनी भाषणाची संधी दिली.

भाषण संपल्यावर ते निघून गेले. त्यानंतर अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात आमदार धर्मरावबाबांनी दीपक आत्राम यांच्या आरोपांचे खंडण करून प्रत्युत्तर दिले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी अपघातग्रस्त शिक्षक वासुदेव कुळमेथे यांच्या पत्नीला स्वत:च्या संस्थेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी मागणी केली म्हणून नाही तर तो माझा नियम आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर काही लोकांना बोलायला व्यासपीठ मिळत नाही, त्यामुळे आता ते इथे बोलत होते, असे म्हणत दीपक आत्रामांवर टीकास्त्र सोडले.

दीपक आत्राम यांचा आरोप

२० मे रोजी लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे बळी पडलेले शिक्षक वासुदेव कुळमेथे यांच्या कुटुंबाला कंपनीने २५ लाख भरपाई देऊन एका व्यक्तीला नोकरी द्यावी, अपघातानंतर वाहतूक पोलिस अंमलदार संतोष मंथनवार यांनी मृतदेह रुग्णालयात पाठवून पंचनामा न करता रस्त्यावर सांडलेल्या रक्तावर पाणी टाकून पुरावे नष्ट केले. त्यामुळे मंथनवार यांना बडतर्फ करावे. दि. ३० मे रोजी कंपनीने ८९ सुरक्षारक्षक व पर्यवेक्षक नेमले. मात्र, त्यात एका विशिष्ट राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्याऐवजी गोरगरीब लोकांची नियुक्ती करावी, अशी मागणी माजी आमदार दीपक आत्राम यांनी केली.

धर्मरावबाबा बाबांचा प्रत्यारोप

अपघातातील मृत शिक्षकाच्या पत्नीला माझ्या संस्थेत नोकरी देणार आहे. मला तुम्ही दहा वर्षे घरी बसविले, आता मला पुन्हा संधी दिली. आज साडेतीन हजार लोक कंपनीत कामाला आहेत. मी माझ्या जवळच्यांना नोकरी दिल्याचा आरोप होत असेल तर ते खेदजनक आहे. मला तसली राजकीय दुकानदारी जमत नाही. माझ्या भागातील शिकलेल्या, गरजू व गरीब लोकांना संधी मिळाली पाहिजे, हा एकमेव माझा उद्देश असल्याचा खुलासा आ. धर्मरावबाबा यांनी केला.

Web Title: Deepak Atram was stopped by the police, and his speech was interrupted when he entered the stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.