दुर्गापूरच्या कोळसा खाणीच्या विस्तारीकरणाला विरोध

By साईनाथ कुचनकार | Published: June 5, 2023 03:48 PM2023-06-05T15:48:15+5:302023-06-05T15:48:59+5:30

पर्यावरण दिन : ताडोबा बचाव समितीचा जंगल, वाघ आणि वन्यजीव संरक्षणासाठी उपक्रम

Opposition to Durgapur coal mine expansion, Tadoba Rescue Committee's initiative for forest, tiger and wildlife conservation | दुर्गापूरच्या कोळसा खाणीच्या विस्तारीकरणाला विरोध

दुर्गापूरच्या कोळसा खाणीच्या विस्तारीकरणाला विरोध

googlenewsNext

चंद्रपूर : दुर्गापूर ओपन कास्ट कोळसा खाणीच्या विस्तारीकरणाला चंद्रपूर शहरातील पर्यावरण कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकांनी पर्यावरण दिनी एकत्र येत थेट खान क्षेत्रात जाऊन विरोध दर्शविला. ही खाण मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. यामुळे जल, जंगल आणि वाघाचा अधिवास कमी केला असून येथे वन्यजीव मानव संघर्ष सुरू आहे.

२०२२ मध्ये जिल्ह्यात सर्वात जास्त ५३ लोकांचा बळी मानव वन्यजीव संघर्षात गेला आहे. असे असतानाही पुन्हा नव्याने या जिल्ह्यात दाट जंगल कोळसा खाणींच्या घशात टाकू नये, अशी मागणीही पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
महाराष्ट्र शासनाने आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या खाणीला मंजुरी दिली आहे. अतिशय दाट जंगल असलेली सुमारे ३०० एकर जमीन या कोळसा खाणीसाठी मंजूर करण्यात आली आहे. ही खान १३ वर्षांपूर्वी येऊ घातलेल्या अदानी कोळसा ब्लॉकला लागून, सिनाळा गावाजवळ आहे. या खाणीच्या परिसरात किमान आठ ते दहा वाघ आणि असंख्य वन्यजीव असल्याने चंद्रपूर परिसरात पर्यावरण आपत्ती निर्माण होण्याची शक्यता आहे.

या खाणीला विरोध करण्यासाठी इको प्रोचे बंडू धोत्रे, प्रा. सुरेश चोपणे, डॉ. योगेश दूधपचारे, दीपक दीक्षित, अनिल राइन्कवार, ॲड. मलिक शाकिर, किशोर जामदार, नितीन रामटेके, शेख वाजिद, विजय साळवे, डॉ आशिष महातळे, जयेश बेले, अतुल वासुदेव, मनीष गावंडे, भूषण ढवळे, अरुण सहाय, मनोज पोतराजे, भूषण फुसे, संजय जावडे, राजू काहीलकर, सुनील लिपटे, सुमित कोहळे, जयेश बैनालवार, बंडू दुधे, अनिल ठाकरे आदींनी उपस्थिती लावली.

वृक्षांची होणार कत्तल

१३ हजार ४५७ मोठे वृक्ष आणि ६४ हजार ३४९ बांबू कोळशासाठी तोडले जाणार आहेत. चंद्रपूर शहराला ही खान लागूनच असल्यामुळे आधीच प्रदूषित शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. ही कोळसा खान आल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील हा संघर्ष आणखी शिगेला पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Opposition to Durgapur coal mine expansion, Tadoba Rescue Committee's initiative for forest, tiger and wildlife conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.