मोबाइल महाराष्ट्राचा अन् नेटवर्क तेलंगणाचे! फोन करायला जायचे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 02:59 PM2021-10-20T14:59:12+5:302021-10-20T16:19:38+5:30

मागील चार वर्षांपासून लांबोरी येथील जिओच्या टॉवरचे काम पूर्ण झाले मात्र, ते अद्याप सुरू करण्यात आले नाहीत. नेटवर्कची सुविधा नसल्यामुळे जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. एखादा महत्त्वाचा फोन जर करायचा असेल, तर डोंगरमाथ्यावर जाऊन नेटवर्क शोधावे लागते आणि फोन करावा लागतो.

Mobile Maharashtra's network in Telangana! | मोबाइल महाराष्ट्राचा अन् नेटवर्क तेलंगणाचे! फोन करायला जायचे कुठे?

मोबाइल महाराष्ट्राचा अन् नेटवर्क तेलंगणाचे! फोन करायला जायचे कुठे?

googlenewsNext
ठळक मुद्देजिवती तालुक्यातील अनेक गावांत नेटवर्क नाही

दीपक साबने

चंद्रपूर : एकीकडे शासनाच्या विविध योजना इंटरनेटच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत; परंतु नेटवर्कअभावी लांबोरी व परिसरातील गावांतील नागरिकांना विविध योजनांच्या माहितीपासून वंचित राहावे लागत आहे. लांबोरी, येल्लापूर, नारपठार, बुरियेसापूर, शेडवाही (लांबोरी) इत्यादी व परिसरातील गावांतील हजारो मोबाइलधारकांना तेलंगणाच्या नेटवर्कवर विसंबून राहावे लागत आहे.

तालुक्यात लांबोरी, पुडियाल मोहदा, वणी या तीन गावांमध्ये जिओचे टॉवर उभे केले आहेत. मागील चार वर्षांपासून लांबोरी येथील जिओच्या टॉवरचे काम पूर्ण झाले आहे मात्र, अद्याप सुरू करण्यात आले नाहीत. ते फक्त शोभेची वस्तू बनले आहेत. लांबोरी व परिसरातील गावात नेटवर्कची सुविधा नसल्यामुळे जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. एखादा महत्त्वाचा फोन जर करायचा असेल, तर डोंगरमाथ्यावर जाऊन नेटवर्क शोधावे लागते आणि फोन करावा लागतो. तरीही नेटवर्कअभावी बरोबर बोलणे पण होत नाही. ही अवस्था तालुक्यातील बहुतेक गावांची आहे.

मागील चार वर्षांअगोदर जिओच्या टॉवरचे काम सुरू झाले, ते पाहून नागरिक आनंदी होते. गावकऱ्यांनी जिओचे सीम घेऊन ठेवले. आज ना उद्या हे जिओचे टॉवर सुरू होतील आणि आपली नेटवर्कची समस्या सुटेल या आशेत गावकरी होते. मात्र, या आशेवर मागील चार वर्षांपासून विरजण पडल्याचे चित्र लांबोरी, पुडियाल मोहदा, वणी या गावांतील व परिसरातील नागरिकांत दिसून येत आहे.

ग्रामपंचायत लांबोरी येथे लोकमत प्रतिनिधीने भेट दिली असता जिओचे टॉवर दिसले. तो सुरू करण्यास ना हरकत प्रमाणपत्रदेखील ग्रामपंचायतीने दिले आहे. यासंदर्भात अनेक निवेदनेही देण्यात आली; परंतु अद्याप जिओचे टॉवर सुरू झाले नाहीत. टॉवर असून नेटवर्क नसल्यामुळे मोबाइलधारकांना तेलंगणा राज्याच्या नेटवर्कवर अवलंबून राहावे लागत आहे.

लांबोरी या गावच्या परिसरातील नागरिक नेटवर्कच्या शोधात असतात. नेटवर्क भेटलेच तरी संपर्क होणे कठीण होते. इंटरनेट सेवा तर कुचकामीच ठरत आहे. अनेक अडचणींचा सामना गावकऱ्यांना व गावातील परिसरातील लोकांना सहन करावा लागत आहे. जिओचे टॉवर सुरू झाल्यावर मोबाइलधारकासह, शासकीय निमशासकीय कार्यालयातील कामकाज करताना याचा लाभ होणार आहे. नेटवर्क नसल्यामुळे महागडे रिचार्ज निकामी ठरत आहेत.

Web Title: Mobile Maharashtra's network in Telangana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.