राज्यात मंत्रिमंडळच नसल्याने पूरग्रस्त वाऱ्यावर; अजित पवार यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2022 11:29 AM2022-07-29T11:29:46+5:302022-07-29T11:40:18+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Ajit Pawar targeted the CM Eknath Shinde and Dy CM Devendra Fadnavis | राज्यात मंत्रिमंडळच नसल्याने पूरग्रस्त वाऱ्यावर; अजित पवार यांचा टोला

राज्यात मंत्रिमंडळच नसल्याने पूरग्रस्त वाऱ्यावर; अजित पवार यांचा टोला

Next

चंद्रपूर : पुरामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत नुकसान झाले. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यालाही फटका बसला. मात्र, राज्यात मंत्रिमंडळच अस्तित्वात आले नसल्याने पूरग्रस्त अजूनही वाऱ्यावर आहेत, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. गुरुवारी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, चंद्रपूर शहर अध्यक्ष राजीव कक्कड उपस्थित होते. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, चंद्रपूर शहरालगतच्या नदीकाठावर वस्त्या तयार झाल्या. या भागात बेकायदेशीर प्लॉट विक्रीही केली जाते. पूरग्रस्त भागात वस्त्याच उभा व्हायला नको, अशी सूचना देऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

चंद्रपूर, परभणी, लातूर, अकोला या चार मनपांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे. पायाभूत सुविधांचाही अभाव असल्याचे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने शेतकऱ्यांना ५ हजारऐवजी १० हजारांची मदत द्यावी व वेकोलीच्या ओव्हर बर्डनविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचनाही विरोधी पक्षनेते पवार यांनी दिल्या. दरम्यान, पूरग्रस्त भागाचा दौरा झाल्यानंतर काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर व महाविकास आघाडीतून एकनाथ शिंदे सरकार सोबत गेलेले चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी पवारांनी भेट दिली.

उणेदुणे काढण्यात अर्थ नाही

राजकारणात कुणाचे आमदार कोणाच्या संपर्कात आहेत, हे सांगण्याची गरज नाही. एकमेकांचे उणेदुणे काढण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा सर्वांनी राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिला. माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला उत्तर देताना, आम्ही देखावा करीत नाही, प्रत्यक्ष मदत करतो. बडबड करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घ्या. केंद्रात आणि राज्यातही भाजपचेच तुमचेच सरकार आहे, असेही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

Web Title: Ajit Pawar targeted the CM Eknath Shinde and Dy CM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.