अन् हत्तीने फूटबॉलसारखी उडविली दुचाकी; थरारक Video सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 04:36 PM2022-12-08T16:36:17+5:302022-12-08T17:03:53+5:30

लाखांदूर तालुक्यातील इंदोरा ते मेंढा मार्गावरील प्रकार

wild elephant threw and crushed the bike like a football, video viral; incident in lakhandur tehsil of bhandara dist | अन् हत्तीने फूटबॉलसारखी उडविली दुचाकी; थरारक Video सोशल मीडियावर व्हायरल

अन् हत्तीने फूटबॉलसारखी उडविली दुचाकी; थरारक Video सोशल मीडियावर व्हायरल

googlenewsNext

दयाल भोवते

लाखांदूर (भंडारा) : तालुक्यात दाखल झालेल्या हत्तीचा कळप पाहायला दुचाकीने जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. हत्तीचा कळप पाहताच दुचाकी रस्त्यावर ठेवून तरुणांनी धूम ठोकली. मात्र त्याचवेळी कळपातील एका हत्तीने दुचाकीला अक्षरश: फूटबाॅलसारखे उडवून पायाखाली चिरडले. ही घटना लाखांदूर तालुक्यातील इंदोरा ते मेंढा मार्गावर गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

दोन दिवसापुर्वी जंगली हत्तींचा कळप लाखांदूर तालुक्यात दाखल झाला. दहेगाव येथे घरांची तोडफोड केली. दरम्यान गुरुवारी सकाळी हत्ती लाखांदूर तालुक्यातील इंदोरा ते मेंढा दरम्यान असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. अनेक जण हत्ती पाहण्यासाठी या मार्गावर पोहचले. सुरेश दिघोरे हेही एका सहकाऱ्यासोबत दुचाकीने हत्ती पाहण्यासाठी गेले. त्यावेळी एका व्यक्तीने सुरेशला हत्ती आल्याचे सांगितले. गोंधळलेल्या अवस्थेत सुरेशने दुचाकी रस्त्यावर उभी केली आणि धूम ठोकली.

काही वेळातच हत्तीचा कळप या मार्गावर आला. रस्त्यावर असलेली दुचाकी फूटबाॅलसारखी उडविली आणि एका बलदंड हत्तीने दुचाकी पायाखाली चिरडली. हा प्रकार दुरून सुरेशसह अनेकजण पाहत होते. हत्तीचा कळप निघून गेल्यानंतर दुचाकीजवळ पोहचले. तेव्हा दुचाकीचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. आता या घटनेचा व्हिडीओ तालुक्यात चांगलाच व्हायरल झाला आहे.

हत्तीचा कळप गावात शिरला, तीन घरांची तोडफोड; ग्रामस्थ भयभीत, वन विभाग त्रस्त

हत्तींचा मुक्काम बेलबनात

लाखांदूर तालुक्यात दोन दिवसांपासून हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. ६ डिसेंबरच्या रात्री दहेगाव (माइन्स) येथे गावात शिरुन तीन घरे जमीनदोस्त केली. वनविभागाने या हत्तींच्या कळपाला जंगलात पिटाळून लावले. गुरुवारी सकाळी हा कळप इंदोरा ते मेंढा मार्गावर दिसून आला. सध्या या हत्तीच्या कळपाने इंदोरा लगत असलेल्या बेलबनात मुक्काम ठोकल्याची माहिती आहे. हत्ती पाहण्यासाठी या परिसरात एकच गर्दी होत असून अप्रिय घटना टाळण्यासाठी वनविभाग वारंवार सूचना देत आहेत. पोलीस विभागाने या परिसरात आता बंदोबस्त लावला असून नागरिकांना हत्तीच्या कळपापासून दूर नेले आहे

Web Title: wild elephant threw and crushed the bike like a football, video viral; incident in lakhandur tehsil of bhandara dist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.