लोककलावंताचा मुलगा एमपीएससीत पास! पण मुलाखतीपूर्वीच झाले असे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 06:07 PM2021-10-19T18:07:49+5:302021-10-19T18:17:55+5:30

देवदर्शनासाठी जाताना कारला अपघात झाला. या अपघातात नीलेशचे दोन्ही हात सहा ठिकाणी फ्रॅक्चर झाले, चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. अशा स्थितीत तो नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या एमपीएससीच्या मुलाखतीला मुकण्याची शक्यता आहे.

Folk artist's son passes MPS .. but, | लोककलावंताचा मुलगा एमपीएससीत पास! पण मुलाखतीपूर्वीच झाले असे...

लोककलावंताचा मुलगा एमपीएससीत पास! पण मुलाखतीपूर्वीच झाले असे...

Next
ठळक मुद्देनिलजच्या नीलेशचा संघर्षमय प्रवासलोककलावंताचा मुलगा एमपीएससीच्या मुलाखतीला मुकणार

युवराज गोमासे

भंडारा : गावोगावी लोककला सादर करून उपजीविका करणाऱ्याचा मुलगा राज्य लाेकसेवा आयोगाची (एमपीएससी) पूर्व व मुख्य परीक्षा उत्तम गुणांनी पास झाला. आपली निवड अधिकारी म्हणून होईल असा त्याला आत्मविश्वास होता, मुलाखतीत बाजी मारून आई-वडिलांचे व गावचे नाव मोठे करण्याचे तो स्वप्न पाहत होता. परंतु काळाने घात केला. दसऱ्याच्या दिवशी निलज बुज येथील सहा मित्र डोंगरगड येथे देवदर्शनासाठी जाताना कारला अपघात झाला. या अपघातात त्याचे दोन्ही हात सहा ठिकाणी फ्रॅक्चर झाले, चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. अशा स्थितीत तो नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या एमपीएससीच्या मुलाखतीला मुकण्याची शक्यता आहे.

नीलेश रमेश बांते (२६) असे या तरुणाचे नाव आहे. सध्या त्याच्यावर गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोहाडी तालुक्यातील निलज बुज गावातील नीलेश बांते याच्या संघर्षाची कहाणी अत्यंत खडतर आहे. वडील रमेश बांते यांनी गावोगावी लाेककला संचात कार्यक्रम सादर करून मुलाला शिकविले. नीलेशचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले.

तुमसर येथील जनता विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर शहापूर येथील नानाजी जोशी महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेतले. दहावी व बारावीतही तो गुणवत्ता यादीत आला. अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीत बी-टेक पदवी उत्तम गुणांनी २०१८ मध्ये पूर्ण केली. महाविद्यालयातील कॅम्पसमध्ये मिळालेली लठ्ठ पगाराची खासगी नोकरी सोडून त्याने शासकीय सेवेत जाण्यासाठी तयारी करण्याचा मार्ग निवडला.

अभियांत्रिकी सेवा परीक्षेची तयारी व पोटापाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी त्याने पुणे शहर गाठले. दिवसभर अभ्यासिकेत बसून अभ्यास व रात्री कॉल सेंटरमध्ये काम करायचा. वडील गावागावांत होणाऱ्या मंडई व जत्रांमध्ये तमाशाच्या माध्यमातून कला सादर करायचे. कोरोना काळात जगणे कठीण झाल्याने नीलेश गावाकडे आला. तुमसर शहरात एका खासगी शिकवणीत अल्प शुल्कामध्ये विज्ञान शिकवायचा. सोबत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेचा अभ्यास सुरूच होता.

एमपीएससीच्या पहिल्या परीक्षेत तो अपयशी ठरला. मात्र, जिद्द व आत्मविश्वासाचे बळावर २०१९ ची एमपीएससीची पूर्व व मुख्य परीक्षा पास झाला. एमपीएससी पास होणारा गावातील प्रथम विद्यार्थी ठरला. कोरोनामुळे दीड वर्षांपासून मुलाखती लांबल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात नीलेशला मुलाखतीसाठी जायचे होते. परंतु देव दर्शनाला जाताना भीषण अपघात झाला आणि त्याच्या व कुटुंबीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.

शस्त्रक्रियांसाठी मदतीचा ओघ

अपघातात नीलेशच्या हातांना, खांद्यांना व तोंडाला गंभीर इजा झाली आहे. त्याच्यावर सहा ते सात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. एवढा मोठा खर्च कसा करावा हा, प्रश्र त्याच्या परिवारासमोर आहे. अशात गावकरी व त्याचे मित्र मदतीसाठी धावून आले आहेत. त्यांनी विविध माध्यमातून लोकांकडून पैसे गोळा करायला सुरुवात झाली असून खऱ्या माणुसकीचे दर्शन घडत आहे.

Web Title: Folk artist's son passes MPS .. but,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.