औरंगाबादेत 'बिबी का मकबरा' पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी; मकई गेट परिसरात वाहतूक कोंडींचा मनस्ताप

By योगेश पायघन | Published: August 14, 2022 09:24 PM2022-08-14T21:24:43+5:302022-08-14T21:27:54+5:30

औरंगाबाद येथील 'बिबी का मकबरा' येथे तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई बघण्यासाठी शहरवासीयांनी मोठी गर्दी केली होती.

Aurangabad: Tourists rush to see 'Bibi Ka Maqbara' in Aurangabad; heavy traffic jams in Makai Gate area | औरंगाबादेत 'बिबी का मकबरा' पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी; मकई गेट परिसरात वाहतूक कोंडींचा मनस्ताप

औरंगाबादेत 'बिबी का मकबरा' पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी; मकई गेट परिसरात वाहतूक कोंडींचा मनस्ताप

googlenewsNext

योगेश पायघन 
औरंगाबाद:
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त औरंगाबाद येथील 'बिबी का मकबरा' येथे 7 ऑगस्टपासून तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही रोषणाई बघण्यासाठी शहरवासीयांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे मकई गेट परिसरात दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

स्वातंत्र्य दिनाला लागून आलेल्या सुट्यांमुळे पर्यटकांची संख्या वाढलेली असतानाच भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडून विविध स्मारकांच्या परिसरात विविध उपक्रमांची रेलचेल आठवडाभरापासून आहे. त्याचाच एक भाग म्हणून मकबऱ्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली. ही तिरंगी रोषणाई शहरवासीयांचे लक्ष वेधत आहे. दरम्यान, 15 ऑगस्टपर्यंत तिकीट नसल्याने पर्यटकांच्या संख्येत भर पडल्याने मकबरा परिसर रविवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गजबजला होता. 

रात्री 8 वाजेनंतर मकई गेट व पुलाच्या समोरच्या परिसरात तसेच बेगमपुऱ्याच्या मुख्य चौकात वाहतूक कोंडी झाली होती. त्यात पहाडसिंगपुरा परिसरात घरी परतणाऱ्यांना असुविधेला सामोरे जावे लागले. मकबरा-बेगमपुऱ्याच्या चौकापासून जय भीमनगर तर दुसऱ्या बाजुने विद्यापीठ गेटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुक कोंडी झाल्याने अनेकांना पायपीट करत वाट धरावी लागली. यावेळी काहीजण हुल्लडबाजी करत होते. यावेळी परिसरात पोलीस दाखल झाले आणि गर्दी नियंत्रणात आणत आहेत, तर दूरवरुन आलेले पर्यटक थोडावेळ तरी मकबरा बघू द्या, अशी आर्जव पोलिसांकडे करत होते.

Web Title: Aurangabad: Tourists rush to see 'Bibi Ka Maqbara' in Aurangabad; heavy traffic jams in Makai Gate area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.