अकोला जिल्ह्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा इतिहास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 06:53 PM2021-10-14T18:53:33+5:302021-10-14T18:55:24+5:30

History of Dhamma Chakra Pravartan Day : दोन मोठी वैशिष्ट्य असतील ती म्हणजे बायपास शस्त्रक्रिये नंतर बाळासाहेब आंबेडकर हे तब्बल तीन महिन्या नंतर प्रथमच जनतेसमोर येणार आहेत.

History of Dhamma Chakra Pravartan Day celebrations in Akola district | अकोला जिल्ह्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा इतिहास 

अकोला जिल्ह्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा इतिहास 

googlenewsNext

गेली ३४ वर्षे अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा अखंडपणे सुरु आहे.एकच नेता, विशाल मिरवणूक,  प्रचंड प्रतिसाद,ओसंडून वाहणारा उत्साह, आखाडे, लेझीम पथके, आकर्षक देखावे,विविध झाक्या, हजारोचा स्वंयशिस्त समूह, कमालीचे आज्ञाधारी कार्यकर्ते, वर्षागणीक वाढत जाणारी गर्दी,  भारतीय बौद्ध महासभेचे शिस्तबद्ध आयोजन, आणि महाराष्ट्राला राजकीय सामाजिक दिशा देणारी जाहीर सभा असा दरवर्षीचा शिरस्ता... अकोला क्रिकेट क्लब मैदानावर ९ ऑक्टोबर २०१९ रोजी हया  वर्षीचा धम्म मेळावा आयोजित केला गेला होता.तसेच अकोला रेल्वे स्टेशन ते क्रिकेट क्लब मैदाना पर्यत जंगी मिरवणूक काढण्यात आली होती.त्यानंतर कोरोना प्रादुर्भाव झाला आणि मागील वर्षी डिजिटल सोहळा साजरा करावा लागला.ह्यावर्षी देखील सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नसल्याने हा सोहळा देखील मर्यादित स्वरूपात साजरा केला जात आहे.ह्यावेळीच्या सोहळ्याला दोन मोठी वैशिष्ट्य असतील ती म्हणजे बायपास शस्त्रक्रिये नंतर बाळासाहेब आंबेडकर हे तब्बल तीन महिन्या नंतर प्रथमच जनतेसमोर येणार आहेत.आणि त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या अकोल्यातील शिलेदारांनी प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर ह्यांचे नेतृत्वात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पक्ष जिल्हयात सर्वात मोठा पक्ष म्हणून बहुमान कायम ठेवला आहे.त्यामुळे १६ ऑक्टोबर २०२१ रोजीचा सोहळा महाराष्ट्रासाठी खास असणार आहे.  
भारिप बहुजन महासंघ (आताची वंचित बहुजन आघाडी) व भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त परिश्रमाने ऍड. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर “ अकोला पॅटर्न “ जन्माला घालण्यात ह्या “विशाल मिरवणूक व जाहीर सभांचा“ सिंहाचा वाटा राहिला आहे.तीन पिढ्यातील बदल अनेक बदल अकोला जिल्ह्याने या  निमित्ताने पाहिलेत. परंतु अगदी पहिल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्या पासूनच आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले एड. बाळासाहेब आंबेडकर हेच या वर्षी देखील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण आहेत.सलग ३४ वर्षे असाच पायंडा आणि आकर्षण असलेला हा सोहळ्याच्या आयोजनाचा इतिहास नव्या पिढीला कळावा म्हणून केलेला लेखन प्रपंच आहे.

पहिले पाऊल 


१४ ऑगस्ट १९८० ला विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे नातू एड. प्रकाश तथा  बाळासाहेब आंबेडकरांचे  अकोल्यातील सर्किट हाऊस येथे प्रथमच आगमन झाले होते. कृष्णा इंगळे व एक रेल्वे कर्मचारी त्यांचे सोबत होते.नगर परिषद येथे आयोजित बाळासाहेबांचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द झाला होता.ही बातमी अकोल्यातील तत्कालीन नेतृत्व दिनबंधू गुरुजी, केरुबुवा गायकवाड ह्यांचे कार्यकर्ते लंकेश्वर गुरुजी, गुणवंतराव पाटील,पी. आर. महाजन,शत्रुघन मुंडे, कृष्णराव मोहोड, यादवराव पाटील व भाऊसाहेब इंगळे ह्यांना समजली.बाबासाहेबांचे नातू अकोला जिल्ह्यातून सभा न होता परत जाणे ही आपल्या जिल्ह्यासाठी नामुष्कीची बाब आहे, हे हेरून त्या सर्व कार्यकर्त्यानी दुपारी बाळासाहेबांची भेट घेतली आणि अकोल्यात सभेसाठी वेळ देण्याची मागणी करण्यात आली.रात्री ८ वाजता अकोट फैल येथे सभेची निश्चित करण्यात आली.तत्पूर्वी सायंकाळी सहा वाजता भीम नगर येथे तत्कालीन जुने पुढारी शंकरराव खंडारे ह्यांचे घरी बाळासाहेबाना नेण्यात आले.साक्षात बाबासाहेबांचे नातूच आपल्या मोहोल्यात आल्याने बाळासाहेबांना पहायला तोब्बा गर्दी झाली.प्रत्येकाला ह्या तरण्याबांड आंबेडकरां मध्ये बाबासाहेबच दिसत होते.भारावलेली जनता डोळे भरून हे प्रतिरूप पाहत होते.त्यांच्या पाया पडत होती, त्यांना स्पर्श करत होती, त्यांच्या पायाची माती कपाळावर लावत होती.सर्व आसमंत भारवला होता.ह्या प्रचंड गर्दीत पहिली सभाच भीमनगर मध्ये पार पडली.त्यावेळी जिल्हयातून पहिला हार बाळासाहेबांना घातला तो बौद्ध आखाड्याचे सूर्यप्रकाश उर्फ त्र्यंबक पहेलवान हयांनी. अर्थातच त्या नंतर रात्री ८ वाजताची नियोजित सभा भारतीय बौद्ध वाचनालय अकोट फैल येथे देखील प्रचंड गर्दीत संपन्न झाली.या प्रसंगा नंतर बाळासाहेबांशी जुळलेल्या कार्यकर्त्यानी लगेच दोन महिन्यात बाळासाहेबांची सभा ११ ऑक्टोबर १९८० रोजी अकोट येथील खरेदी विक्री संघाच्या पटांगणावर घेतली.त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला.त्या मुळे वातावरण निर्मिती झाली.भारावलेले कार्यकर्ते संपूर्ण ताकदीने कामाला लागले त्याकाळी खिशात पैसा, साधने, मोटर वाहने किंवा साधा लाऊडस्पिकरची सोय नसताना केवळ चळवळ मोठी झाली पाहिजे ह्या ध्यासाने  खेडोपाडी, वस्त्यांमध्ये सायकलवर फिरत कार्यकर्त्यानीअकोला जिल्हा बांधला.
तसा अकोला जिल्हा चळवळीचा बालेकिल्लाच होता.डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा भारताच्या सामाजिक राजकिय क्षितिजावर नेतृत्व उदय झाल्यानंतर त्यांचे पाठीशी हा जिल्हा प्रचंड ताकदीने उभा झाला.आंबेडकरी चळवळीतील कलापथके,गीतकार, शाहीर, जलसे, कलापथके, धंडारी,भजनी मंडळानी जागृतीचा वणवा सतत पेटत ठेवला होता.शिक्षण आणि सामाजिक चळवळ प्रामुख्याने जिल्हयात फोफावत होती.राजकीय पटलावर देखील हा जिल्हा दखलपात्र जिल्हा होता.शेड्यूल कास्ट फेडरेशनचे व-हाड प्रांतिकचे ९ व १० डिसेंबर १९४५ ला बाबासाहेबांच्या उपस्थितीत अकोल्यात संपन्न झाले  होते.भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, शेकाफे चे कार्य मोठ्या गतीने सुरु होते.भय्यासाहेब आंबेडकरांनी देखील तब्बल ८ वेळा ह्या जिल्ह्याचा दौरा केला होता.तसेच रिपब्लिकन पक्षाच्या प्रेसिडीयमची पहिली बैठक देखील २८,२९ व ३० डिसेंबर १९५७ साली अकोल्यातच संपन्न झाली होती.बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्विकाराच्या आवाहना नुसार १००% बौद्ध धम्म स्वीकारणारा जिल्हा अकोलाच आहे.१९०१ सालच्या जनगणनेत एकही बौद्ध धर्मीयांची नोंद नसलेल्या अकोला (वाशीम संयुक्त) जिल्ह्यात १९५६ ला धम्म स्वीकाराच्या नंतर १९६१ च्या जनगणनेत दोन लाख बेचाळीस हजार चारशे चौसष्ट बौद्ध धर्मीयांची संख्या नोंदविण्यात आली होती.एवढी प्रचंड आंबेडकरी निष्ठा असलेला जिल्ह्या म्हणून अकोल्याचा लौकिक होता.
त्या मुळे हे तरूण आंबेडकर पहिल्याच दिवशी नेते म्हणून अकोला जिल्ह्यात स्विकारले गेले.भारतीय बौद्ध महासभेचे कार्य व महाउपासिका मीराताई आंबेडकर व बाळासाहेबांचा राबता ह्या जिल्ह्यात वाढविण्यात तत्कालीन पदाधिकारी कार्यकर्ते यशस्वी झाले.

अशी झाली सुरुवात ...
हा ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन सोहळा सुरु करण्याची कल्पना त्या काळच्या जुन्या व दूरदर्शी कार्यकर्त्यांना सहजच सुचली होती.बाळासाहेब आंबेडकर ह्यांना शेगांव येथे रेल्वे स्टेशनवर सोडून देताना, ह्या कल्पनेचा जन्म झाला होता, हे सांगितल्यास कुणालाही नवल वाटल्या शिवाय राहणार नाही.खामगांव येथे बाळासाहेबांची सभा होती.शिरस्त्याप्रमाणे सभा संपली की त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडले जाई.खामगांवची सभा संपल्यावर शेगांव रेल्वे स्टेशन वर सोडायला अकोल्यातील कार्यकर्ते लंकेश्वर गुरुजी, गुणवंतराव पाटील,पी. आर. महाजन,बी.आर.सिरसाट व श्रीकृष्ण वानखडे गेले होते.सातत्याने नवनवीन प्रयोग करून लोकसंग्रह करण्याचा त्या काळच्या कार्यकर्त्याचा हातखंडा होता.
संघटना बांधणी बाबत चर्चा सुरु असताना नागपूरच्या धर्तीवर अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम घेण्यासाठी चर्चा झाली.नागपूरला कार्यक्रम होऊन अनेक अनुयायी बुलढाणा वाशीम व मराठवाडा भागात परत जाताना अकोला रेल्वे स्टेशनवर मुक्कामी असत. त्या काळी फार दळणवळणाची साधने नसल्याने रेल्वे स्टेशन आणि  स्थानकावर मुक्कामी राहण्याशिवाय पर्याय नव्हता.त्या दृष्टीने अकोल्यात हा सोहळा आयोजित केला तर अनुयायां करीत सोयीचं होईल, असा विचारविनिमय करून हा सोहळा आयोजनाचा निर्धार करून कार्यकर्ते शेगांव वरून परतले.लागलीच त्याची अंमलबजावणी झाली. अशोक वाटिका येथे बैठकित सर्वांनी हे आयोजन मान्य केले आणि १९८६ साली पहिला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम अशोक वाटिके समोरील मैदान पोस्ट ऑफीस मागे संपन्न झाला.नागपूर नंतर संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणारा हा भव्य दिव्य सोहळा ठरला आहे.वसंत देसाई स्टेडीयम वर अनेक वर्षे हा कार्यक्रम व्हायचा.आता गेली ११ वर्षे अधिक काळापासून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर हा सोहळा संपन्न होतो.कोरोना मुळे दोन वर्षे हा सोहळा अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष ह्यांचे निवास्थानी असलेल्या प्रांगणात घेतला जात आहे.
ह्या सोहळ्याचे अनेक वैशिष्ट्य राहिलीत.मीराताई आंबेडकर ह्यांचे सोबत भिमरावजी आंबेडकर, आनंदराज आंबेडकर व बाळासाहेब ह्या भावंडाची एकत्रित उपस्थिती असो किंवा अगदी दोन वर्षा पूर्वी बाळासाहेबां सोबत प्रा.अंजलीताई आंबेडकर, मनीषाताई आनंदराज आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या चौथ्या पिढीतील सुजात आंबेडकर, ऋतिका भीमराव आंबेडकर, साहील आणि अमन आंबेडकर ह्यांची हजेरी असो, अनेक विशिष्ट असलेला हा महोत्सव अनेक अर्थांनी वेगळा असतो.त्या १९८० च्या दशकात बाळासाहेबांसाठी खास करून हत्ती आणून हत्ती वर काढण्यात आलेली मिरवणूक,शेगांव संस्थान येथील चंपाकली नावाची हथींनी आणून काढलेली बाळासाहेबांची मिरवणूक हा अनेक वर्षे प्रचंड कुतूहल आणि चर्चेचा विषय होता.
त्याही पेक्षा जिल्ह्याला भारावून टाकणारा एक प्रसंग घडला होता तो अगदी पहिल्याच सोहळ्यात.ह्या पहिल्या सोहळ्यात मीराताई आंबेडकर ह्या भाषणासाठी उभ्या राहिल्या ,त्यांनी सांगितल की “ बाबासाहेबांनी आपल्या हयातीत जे काही कमवलं ते सर्व समाजाला देवून टाकलं, माझ्या कडे बाबासाहेबांनी कमाविलेल्या संपत्तीचे काहीही नाही.परंतु आज समाज आंबेडकर कुटुंबांकडे प्रचंड आशेने पाहतो,माझ्या कडे बाबासाहेबांची संपती नसली तरी माझ्या कडे बाबासाहेबांचा नातू आहे आणि तो मी आज समाजाच्या ओटीत टाकते ....” मीराताईंच्या ह्या वाक्याने सभा स्तब्ध झाली,मीराताईंच्या भाषणाने उपस्थित समूहाच्या काळजाचा वेध घेतला होता. जनतेच्या डोळ्यात अश्रू तरळले.टाळ्यांचा प्रचंड कडकडाटात "बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा स्विकार केला गेला" आंबेडकरी चळवळीतील ही अभूतपूर्व घटना होती. नेता, पक्ष, संघटना फिनिक्स पक्षा प्रमाणे झेपावली.पुढच्या काळात ’बहुजन सारे एक होवू सत्ता आपल्या हाती घेऊ ‘हा नारा देत सत्ताबाह्य समूहाला सत्ताधारी होण्याचा राजमार्ग प्रशस्त करणा-या ‘अकोला पॅटर्नने’ जन्म घेतला. महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटा वरील अनेक प्रस्थापितांना सत्तेतून बेदखल केले.आणि बहुजनांची सत्ता प्रस्थापित केली.ह्यात अनेक ज्ञात अज्ञात कार्यकर्ते पदाधिकारी ह्यांचे मोलाचे योगदान आणि आंबेडकर कुटुंबाची ४० बहुमुल्य वर्ष आहेत हे विसरता येणे शक्य नाही.

३ जानेवारीचा बंद आणि त्या अनुषंगाने घडलेले  क्रान्तिकारी बदल ह्या पार्श्वभूमीवर ह्या वर्षी राज्याचे भवितव्य ठरविणारी निवडणूक पार पडली.वंचित बहुजन आघाडीच्या बांधणीचा धडाका व वंचित बहुजन आघाडीच्या अभूतपूर्व सभांनी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.त्यामुळे लोकसभेत  ४२ लाख मतदार लोकसभेत वंचित च्या बाजूने उभे झाले.त्या मुळे राज्यातील एक मोठी ताकद म्हणून वंचित पुढे आली.विधानसभेच्या निवडणुकीत स्वबळावर उभे असलेल्या वंचितने २४ लाख मतांची बेगमी केली.वंचितचा अभूतपूर्व जनप्रतिसाद पाहता विरोधकांना धडकी भरली आहे.दरम्यान ओबीसी आरक्षण गेल्याने सहा जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या.बाळासाहेबांचे बायपास झाले असल्याने ते तीन महिने सार्वजनिक जिवनात नव्हते.अकोल्यासह विविध ठिकाणी आघाडी सरकार मधील तीन पक्ष आणि भाजपा विरुद्ध लढत होती.पैसा, सत्ता आणि तीन चार पक्षाची एकवटलेली ताकद ह्याचे विरुद्ध वंचितने कंबर कसली.प्रदेशचे पदाधिकारी प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन पुंडकर (प्रदेश उपाध्यक्ष); राजेंद्र पातोडे (प्रदेश युवक आघाडी महासचिव) सौ. अरूंधतीताई शिरसाट (प्रदेश महिला आघाडी महासचिव);पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोकभाऊ सोनोने, प्रमोद देंडवे (जिल्हाध्यक्ष वंचित); प्रदीप वानखडे (जिल्हाध्यक्ष - भारिप); सौ. शोभाताई शेळके (महासचिव महिला आघाडी); यांच्यावर १४ जिल्हापरिषद व २८ पंचायत समिती मतदार संघातील प्रचार नियोजनाची व देखरेखेची जबाबदारी आली.त्यांनी अकोला जि. प. पोटनिवडणुक २०२१ साठी निरिक्षक नेमण्यात येत आहेत. संबंधित मतदार संघात पक्षाला विजय प्राप्त होण्याच्या दृष्टीने निरिक्षकांनी आवश्यक त्या सर्व उपाय योजना व उमेदवाराला सहाय्य करावे. उमेदवाराची प्रचार यंत्रणा / बुथ यंत्रणा/वाहन व्यवस्था / जेवणाची व्यवस्था याचे त्यांनी उमेदवाराला नियोजन करून  नेमुन दिलेल्या मतदार संघात विजयश्री प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवार व निरिक्षकांची नेमणूक केली.शिर्ला जिल्हा परिषद मतदार संघाची जबाबदारी राजेंद्र पातोडे, सौ. पुष्पाताई इंगळे,चंद्रशेखर पांडे गुरूजी, अॅड. नरेन्द्र बेलसरे.तर दगडपारवा जिल्हा परिषद मतदार संघ-हिरासींग राठोड,  दामोदर जगताप, सौ. कविताताई राठोड, कुटासा जिल्हा परिषद मतदार संघ-
 प्रदिप वानखडे, अॅड. संतोष रहाटे,  पंजाबराव वडाळ, सौ. शोभाताई शेळके, दिवाकर गवई, घुसर जिल्हा परिषद मतदार संघ- ज्ञानेश्वर सुलताने,  पंजाबराव वडाळ,  अशोक शिरसाट, सचिन शिराळे, कुरणखेड जिल्हा परिषद मतदार संघ -चंद्रशेखर पांडे गुरूजी, शे. साबीर,  दिपक गवई, अशोक शिरसाट, कानशिवणी जिल्हा परिषद मतदार संघ- बालमुकुंद भिरड,  चंद्रशेखर पांडे गुरुजी,  दामोदर जगताप, आकाश शिरसाट,गजानन गवई, विकास सदांशीव,बपोरी जिल्हा परिषद मतदार संघ - बाळुभाऊ ठोकळ, मोहन रोकडे,  राम हिंगणकर, सुनील तामखाने, देगांव जिल्हा परिषद मतदार संघ - राजेंद्रभाऊ पातोडे,  दिनकर खंडारे, अडगांव जिल्हा परिषद मतदार संघ - ज्ञानेश्वर सुलताने,  सैफुल्ला पठाण, सौ. पुष्पाताई इंगळे, दानापूर जिल्हा परिषद मतदार संघ- भगवान हागे,  प्रदीपभाऊ वानखडे, सौ. प्रतिभाताई भोजने,  प्रमोदभाऊ देंडवे, अॅड. संतोष रहाटे,सुभाष रौंदळे,अकोलखेड जिल्हा परिषद मतदार संघ - प्रदीपभाऊ वानखडे, अॅड. संतोष रहाटे, सैफुल्ला पठाण,  प्रशांत मानकर,  संजय कासदे, दिवाकर गवई, तळेगांव जिल्हा परिषद मतदार संघ - सौ. प्रतिभाताई भोजने, अँड. संतोष रहाटे,  ज्ञानेश्वर सुलताने, श्री खारोडे आणि अंदुरा जिल्हा परिषद मतदार संघ - राजेंद्रभाऊ पातोडे, चंद्रशेखर पांडे गुरूजी तसेच लाखपुरी जिल्हा परिषद मतदार संघ - राजेंद्रभाऊ पातोडे,  प्रमोदभाऊ देंडवे,  प्रदीपभाऊ वानखडे, सौ. पुष्पाताई इंगळे ह्यांचेसह  तालुका जिल्हा पातळीवर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लावण्यात आले. प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर आणि अशोकभाऊ सोनोने ह्यांचे सह सर्व कार्यकर्त्यानी निवडणूक खांद्यावर घेऊन १४ पैकी ६ जिल्हा परिषद सदस्य आणि २८ पैकी १६ पंचायत समिती सदस्य निवडून आणले.त्यामुळे खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, शिवसेना आमदार आणि जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख, विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, पालकमंत्री बच्चू कडू, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार गॊवर्धन शर्मा, महापौर अर्चना म्हैसने आणि काही माजी आमदार ह्यांनी संगनमत करीत अनेक ठिकाणी वंचित विरुद्ध मते एकमेकांच्या पक्षाला वळविली.पैसा सत्तेचा प्रचंड वापर केला गेला. तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडी अकोल्यात स्वबळावर सर्वात मोठा पक्ष बनला आहे.ह्या यशाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकर १६ तारखेला महाराष्ट्राला होणा-या प्रबुद्ध भारत वरील live  सभेत काय बोलतात ह्याची  प्रचंड उत्सुकता आहे.  
नांदेड जिल्हयातील देगलूर बिलोली ह्या अनूसूचित जातीसाठी राखीव जागेची पोटनिवडणूक आहे.त्यात पक्षाने डॉ उत्तम इंगोले ह्यांना उमेदवारी दिलेली आहे.  म्हणूनच धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यात बाळासाहेब काय घोषणा करतात, भाषण काय देतात ह्या वर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे.त्या अर्थाने हा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा अर्थात "धम्म मेळावा " राज्याच्या समाजकारण व राजकारणाला नवी दिशा देणारा ठरेल एवढं मात्र नक्की.

- राजेंद्र पातोडे
प्रदेशमहासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
 

Web Title: History of Dhamma Chakra Pravartan Day celebrations in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.